मुंबई : सीएसआर निधी हा केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो आणि तो मुख्यमंत्री सहायता निधीत घेता येत नाही, असा एक आरोप सध्या अनेक राज्यात होतो आहे. मात्र अशा प्रकारचा कायदा 2013 मध्येच तयार झाला होता आणि असे असले तरी एसडीआरएफ खात्यात सीएसआर निधी स्वीकारता येतो, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिली.
'झी 24 तास'ला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. पीएम रिलिफ फंड असताना पीएम केअर फंडची गरज काय, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं. साधरणपणे एखाद्या विशिष्ट कारणासाठी उपखाते तयार केले जाते. महाराष्ट्रात सीएम रिलिफ फंडाचे 9 उपखाते आहेत. पूर, भूकंप अशा विशिष्ट हेतूसाठी ते खाते उघडता येते.
सीएसआर निधी सर्व राज्यांना त्या त्या मुख्यमंत्री मदत निधीत का दिला जाऊ शकत नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, हा कायदा तत्कालिन संपुआ सरकारने 2013 मध्ये केला होता. हा कायदा करताना सुद्धा मोठी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावेळी तत्कालिन सरकारने सांगितले की, सर्व राज्यांना ते मान्य केल्यास ज्या राज्यात कंपन्या अधिक आहेत किंवा जी राज्य मोठी आहेत, त्याच राज्यांना त्याचा लाभ होईल आणि अन्य राज्यांना त्याचा अजिबात फायदा होणार नाही. त्यामुळे सर्व राज्यांना तो मान्य करता येणार नाही.
इतकेच नव्हे तर जेव्हा राज्यात पूरस्थिती निर्माण झाली, तेव्हाही आपण मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला पत्र लिहिले आणि तशी विनंती केली होती. मात्र, केंद्र सरकारने कायदा स्पष्ट असल्याने असे करता येणार नाही, असे कळविले होते. असे असले तरी एसडीआरएफ खात्यात मात्र सीएसआर निधी स्वीकारता येतो. केंद्र सरकारने 23 मार्च आणि 10 एप्रिल अशा दोनवेळा यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले आहेत. सीएसआर निधी मिळत नाही, असेही नाही. तो मिळतोच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळते आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या संबोधनातून स्पष्टपणे सांगत असताना, काही नेते मात्र केंद्राकडून मदत मिळत नसल्याचे सांगून वाद निर्माण करू पाहत आहेत. असे करून वातावरण कलूषित करणे योग्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.