Mukta Tilak Passes Away: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं पुण्यात निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी

मुक्ता टिळक यांची मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी, उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर करण्यात येणार अंत्यसंस्कार

Updated: Dec 22, 2022, 05:17 PM IST
Mukta Tilak Passes Away: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं पुण्यात निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी title=

Mukta Tilak Passes Away: पुण्यातील कसबा मतदार संघाचे (Kasba Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं आज पुण्यात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) उपचार सुरु होते. पण आज दुपारी 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, पण त्यांची ही झुंज आज अपयशी ठरली. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुणे महापालिकेत सलग चार वेळा त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. अडीच वर्ष त्यांनी पुण्याच्या महापौर म्हणूनही कार्यभार सांभाळला. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाच्या पहिल्या महापौर ठरल्या. त्यानंतर 2019 मध्ये विधान सभेच्या कसबा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या. लोकमान्य टिळकांच्या त्या नातसून होत. अभ्यासू नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. 

मुस्ता टिळक यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. पण त्या परिस्थितीतही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत त्यांनी पुण्याहून एम्ब्युलन्समधून मुंबईला येत मतदान केलं होतं. भाजपच्या फायटर आमदार म्हणून त्यावेळी त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. दोन-अडीच वर्ष त्यांना कर्करोगाने ग्रासल्यानंतर त्यांचा सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर कमी झाला, पण रुग्णालयातून त्या लोकांची कामं करत राहिल्या. 

मुक्ता टिळक यांनी पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर फर्ग्युसून महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, मानसशास्त्र विषयातून त्यांनी एम.ए केलं. शिवाय मार्केटिंग विषयाच्या त्या एमबीए होत्या. त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.