मुंबई : राज्यात महाविकासआघाडी सरकारचं टेन्शन वाढलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व आमदार गुजरातच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला फटका बसला. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असं असलं तरी त्यांना शिवसेनेने गटनेतेपदावरुन काढून टाकले आहे.
एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जातील का अशी शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये ही हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी नवा दावा केला आहे. (BJP MLA Jaykumar Gore) यांनी दावा केलाय की, 'देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरातील आषाढी एकादशीची पूजा करतील.'
साताऱ्याचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपपुरस्कृत सरकार अस्तित्वात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाविकासआघाडी सरकार पडणार की डॅमेज कंट्रोल होणार याबाबत अजून काहीही पुढे आलेलं नाही. दुसरीकडे भाजपकडून शिंदे यांना उपमु्ख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.