तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. 

Updated: Oct 24, 2023, 02:47 PM IST
तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें title=

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयांचे चेक तुम्ही गोळा केले. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरचे आम्ही उन्हात आहोत. ज्याला पदे दिलीत ते दूर जाऊ शकतील पण ही जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. दसरा मेळाव्यानिमित्त भाषणावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांचे कार्यक्रमस्थळी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी 'भगवान बाबा की जय'च्या जोरदार घोषणा दिल्या. मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. 

देशात सर्व अलबेल आहे का? शेतकरी आनंदात आहात का? तुम्हाला विमा मिळाला का? शेतात काम आहे का? तुम्हाला दाम मिळतो का? असा प्रश्न त्यांनी सुरुवातीला उपस्थित केला.

जेवढा तू माझी जबाबदारी आहेस, त्यापेक्षा जास्त ही जनता माझी जबाबदारी आहे, असं मी माझ्या मुलाला सांगितल्याचे पंकजा मुडे म्हणाल्या. मी कधी जात-धर्म पाहिला नाही, असे त्या म्हणाले. कोणत्या गावात कार्यकर्त्या आहे मी पाहिले नाही, कोणता समाज पाहिला नाही. मी केवळ तुमचं सळसळतं रक्त पाहिल्याचे त्या म्हणाल्या.

माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, त्याबद्दल मी तुमची माफी मागते, असेही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे दुसऱ्या पक्षात जाणार, पक्ष सोडणार असे प्रश्न मला विचारले जातात. पंकजा मुंडेची निष्ठा इतकी लेचीपेची नाही. देवांनादेखील हार पत्करावी लागली, असेही त्या म्हणाल्या. नितीमत्ता बाजुला ठेवून राजकारण करु शकत नाही, असे म्हणत त्यांनी मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखला दिला. वेळ पडल्यास उस तोडेन, कापूस वेचेन पण मी कुणाच्या मेहनतीचे खाणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 

तुम्हाला हवंय असं राजकारण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गोपीनाथ गड मी 3 महिन्यात बनवला पण स्मारक सरकार बनवू शकले नाही. आता नका बनवू, असे त्या म्हणाल्या. तुमच्यासाठी जे स्वप्न पाहिलंय, ते पूर्ण करायचं. आता पडणार नाही पाडणार! शेतकऱ्यांच्याविरुद्ध राजकारण करणाऱ्यांना पाडणार असे त्या म्हणाल्या. 2024 पर्यंत तुम्हाला न्याय देण्यासाठी मी मैदानात आहे. तुमची इच्छा असेल तर मला कोणी अडवू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.