बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य, भाजप नेत्याला अखेर अटक

 नागपूर ते गडचिरोली धावणाऱ्या एका खासगी बसमधील सीसीटीव्हीत अश्लील कृत्ये करताना कैद झालेल्या गडचिरोलीच्या भाजप नेत्याला अखेर अटक झाली आहे.  

Updated: Jul 5, 2017, 08:35 AM IST
बसमध्ये तरुणीसोबत अश्लील कृत्य, भाजप नेत्याला अखेर अटक title=
फाईल फोटो

गडचिरोली :  नागपूर ते गडचिरोली धावणाऱ्या एका खासगी बसमधील सीसीटीव्हीत अश्लील कृत्ये करताना कैद झालेल्या गडचिरोलीच्या भाजप नेत्याला अखेर अटक झाली आहे. आरोपी भाजप नेत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

हे सीसीटीव्ही फुटेज विदर्भातील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यासंबंधीची तक्रार पीडित युवतीने चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.   

नागपूर ते गडचिरोली धावणा-या एका खाजगी बसमधील एका पुरुष आणि तरुणीची अश्लील कृत्याची दृश्ये विदर्भभर सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. गेले ३ दिवस सोशल मीडिया व विशेषतः व्हॉटसपवर ही क्लिप व्हायरल झाल्यावर यातील पुरुष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील नेता रवींद्र बावनथडे असल्याचे स्पष्ट झाले होते.

पेशाने शिक्षक असलेला या आंबटशौकीन नेता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहे. दृश्यातील महिलेने यासंदर्भात नागभीड पोलीस ठाण्यात पोचत बावनथडे यांनी आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत शोषण केल्याचं आरोप केला. आपल्याला नोकरी देण्याचे आमीष दाखवून बळजबरीने सोबत घेऊन जात बसमध्ये हे कृत्य केल्याचे सांगत तिने ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत आरोपी बावनथडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध चालविला होता. दरम्यान अश्लील व्हिडिओ वायरल झाल्यापासून रवींद्र बावनथडे फरार होता. अखेर नागभीड पोलिसांनी त्याला अटक करत स्थानिक न्यायालयापुढे सादर केले. 

व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आरोपी रवींद्र बावनथडे याला पक्षाने कधीच काढून टाकले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. बससारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी आरोपी रवींद्र बावनथडे याने केला प्रकार शरमेने मान खाली घालणारा असून आता या प्रकरणातील सत्यस्थिती शोधून काढणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.