पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर आल्या. यानंतर राज्याच्या राजकारणातून अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारचr भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते असे पाटील म्हणाले.
अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात. अशी भेट झालीच नाही असं राष्ट्रवादीकडून सांगत आहेत. एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली ? मला कुठले संकेत मिळालेले नाहीत असे ते म्हणाले. काही सूचना वरिष्ठांकडून आली की मानायची असते. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्ष यांची भूमिका मान्य असेल असेही पाटील पुढे म्हणाले.
चंद्रकांत पाटील पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना त्यांच्या मतदार संघातील प्रश्नावर भेटण्यासाठी आले होते. हॅपी कॉलनीतील गोसावी वस्तीतील लोकांना त्रास होत होता. त्यासाठी तिकडे एक पोलीस चौकी व्हावी या मागणीसाठी ही भेट होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला लॉकडाउन हा पर्याय नाही. लोकांनी व्यवहार सुरू केले. नाईट संचारबंदी ठीक आहे पण टेस्टिंग सेंटर वाढवा. संसर्गजन्य रोग आहे हे मान्य पण हे सर्व करून घरी बसा हे शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू. याला व्यापारी इतर सामान्य लोक विरोध करणार असे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. काळजी घेण्यासाठी तुम्ही सांगा. कपडे बदलून झोपडपट्टीत फिरा मग लोकांची अवस्था कळेल. ती मातोश्रीत बसून कळणार नाही असा टोला त्यांनी लगावला. नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते. असेही लोक सात च्या आत घरात असतात. त्यामुळे जे केलं ते ठीक आहे. यापुढे काही केलं तर आम्ही जोरदार विरोध करू असे पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या तब्येतीबद्दल मला नवाब भाईंकडून कळालं. पवार आजारी आहेत. त्यांना लवकर आराम मिळू दे अशी महाराष्ट्राच्या कुलभवानीला प्रार्थना करेन असे ते म्हणाले.
यावेळी पाटील यांनी सरकार पडण्यावर आणि शपथविधीवर भाष्य केलं सरकार टिकेल हे वारंवार सांगावं लागतंय त्यामुळे काहीतरी गडबड आहे. तेव्हाच्या शपथविधीसारखं नंतर कळेल किंवा आधी कळेल. नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते आणि कार्यकर्त्याने ती अंमलात आणायची असते असे ते म्हणाले.