सांगली महापालिकेच्या आयुक्तांविरोधात सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक

भाजप नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Updated: Jun 14, 2019, 12:21 PM IST
सांगली महापालिकेच्या आयुक्तांविरोधात सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. आयुक्तांकडून विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांना हटवा, अन्यथा सर्वांचे राजीनामे घ्या असा आक्रमक पवित्रा सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी घेतला आहे. यासंदर्भात नगरसेवकांनी महापौर संगीता खोत यांच्या लेटरपॅडवर पदाधिकार्‍यांसह ४५ नगरसेवकांच्या सह्यांचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. 

सांगली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेत, भाजपची सत्ता येऊन दहा महिने झाले, तरी एकही विकासकाम झालेलं नाही. असा भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी पवित्रा घेत आयुक्‍त खेबुडकर यांना जबाबदार धरले आहे. आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी कामे अडवून शहराचे वाटोळेच करायचा उद्योग केला, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी भाजप नगरसेवकांच्या पक्षबैठकीला उपस्थित राहून त्यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या. स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत सदस्यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीच रखडलेली कामे आणि योजनांचा पाढाच वाचला. मुख्यमंत्र्यांना भेटून सोमवारी आयुक्तांबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलं आहे.