"उद्धव ठाकरे यांना साधा पेन नाही उचलत आणि ते..."; सीमाप्रश्नावरुन भाजपची बोचरी टीका

Maharashtra Karnataka border issue : शरद पवार यांनी जरा राजकारणातून बाहेर पडून विचार करायला हवा. तिथे जाऊन कुस्ती खेळायचीय का? असा सवाल भाजपने केला आहे

Updated: Dec 7, 2022, 02:19 PM IST
"उद्धव ठाकरे यांना साधा पेन नाही उचलत आणि ते..."; सीमाप्रश्नावरुन भाजपची बोचरी टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Karnataka border issue : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चिघळलाय. मंगळवारी कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली. त्यानंतर राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकला इशारा दिलाय. तर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणे करुन टाकलय अशा शब्दात भाजपवर टीका केली. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एसटी बसेसची तोडफोड करणे बरोबर नाही

"मंत्री गेले नाहीत म्हणून सरकार षंढ आहे, असं म्हणणं हे संजय राऊत यांना शोभणारे नाही. तुमचे सरकार होते तेव्हा सीमाप्रश्नी काय पुढाकार घेतला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना त्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये. एसटी बसेसची तोडफोड करणे बरोबर नाही. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण तातडीने निकाली निघावे यासाठी सरकारला मी विनंती करणार आहे," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आम्हाला चॅलेंज देवू नका

"संजय राऊत जेलमध्ये गेल्यावर तिथल्या कैद्यांकडून षंढ,मर्दानगी हे शब्द घेवून आलेत. अडीच वर्षे षंढ कोण होते ? हनुमान चालिसा म्हणायला का विरोध केलात. त्यावेळी कोण षंढ होते. तुमच्यात मर्दानगी नव्हती का? त्यामुळे आम्हाला चॅलेंज देवू नका, राजकीय वातावरण खराब करू नका. गढूळ वातावरणास उद्धव ठाकरे जबाबदार असतील," असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

 तिथे जाऊन कुस्ती खेळायचीय का? 

"उद्धव ठाकरे, जगंदबेची तलवार उचलण्याची भाषा करता, तुम्हाला साधा पेन उचलत नाहीत. G20 परिषदेला न जावून तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ममता बॅनर्जी गेल्या होत्या,पण तुम्ही गेला नाहीत. हे बोलणं बंद न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल. संजय राऊत यांनी जनतेतून निवडून येवून दाखवावे. सरकार बस फोडा म्हणून सांगत नाही. चिथावणीखोर वक्तव्यांमुळं राज्यातील वातावरण बिघडलंय. शरद पवार यांनी जरा राजकारणातून बाहेर पडून विचार करायला हवा. तिथे जाऊन कुस्ती खेळायचीय का? चांगल्या सूचना करा. याला मुख्यतः कारणीभूत संजय राऊत आहेत. तिकडेही त्यांनी काही षडयंत्र केले असणार. त्यांच्या चिथावणीमुळेच तिकडे उद्रेक होतोय," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.