लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अ‍ॅक्टिव

Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अ‍ॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 13, 2024, 09:11 PM IST
लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अ‍ॅक्टिव title=
Bjp Announced Murlidhar Mohol As Pune Lok Sabha Candidate

BJP Candidates List For Lok Sabha 2024: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी (BJP 2nd candidate list) जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत अनपेक्षित नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने पुण्यातून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी उमेदवारी दिली. अनेक इच्छूक नेत्यांना डावलून अखेर भाजपाच्या वरिष्ठांकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पुणे लोकसभेसाठी काँग्रेसला भक्कम विरोधक मिळाला आहे. अशातच काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. 

खरं तर पुण्यातून सुनील देवधर यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त होती. मात्र, कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का बसल्याने भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या रुपात मराठा चेहरा तयार ठेवला होता. ब्राम्हण समाज नाराज होऊ नये यासाठी धीरज घाटे यांची शहराध्यक्षपदी निवड केली तर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर भाजपने पुण्यात प्लॅन बी अॅक्टिव केला होता. काँग्रेसकडून ब्राह्मणेतर उमेदवार देण्याची तयारी होत असल्याने भाजपने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला होता. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी पक्की झाली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आले. त्यांचे दिल्लीत देखील घनिष्ठ संबंध आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 

मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी बक्षिसांचा पाऊस पडल्याचं दिसून आलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्याला 14 लाखाची थार गाडी भेट देण्यात आली. तर 5 लाखाच बक्षिस ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरीसाठी मुरलीधर मोहोळ यांना वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करावल्या लागल्या होत्या. त्यामुळे दिल्लीत देखील त्यांची ओळख निर्माण झाली होती. मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यातील अनेक पक्षातील नेत्यांसह सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची प्रचिती पुण्यातील विविध भागात पहायला मिळते.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत. 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांचं कौतूक देखील झालं होतं. अखिल भारतीय महापौर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. 2017 मध्ये पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) च्या संचालकपदाचा कारभार देखील त्यांनी हाकला आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता.

काय म्हणाले मोहोळ?

मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मोदींनी केलेलं काम, स्वप्नात असलेली मेट्रो सुरू झाली, चांदणी चौक प्रकल्प अनेक गोष्टी भाजपकडून मिळाल्या. पुन्हा एकदा खासदार हा पुण्याचा महायुतीचा, त्याला मत देईन, मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून कोणाला संधी?

नंदुरबारमधून हिना गावीत, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगांवमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामचंद्र तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.