2019 आणि 2022 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा...

Big Political Happenings Expected In Maharashtra: विधानसभेच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 11, 2024, 12:42 PM IST
2019 आणि 2022 पेक्षा मोठा राजकीय भूकंप? महाराष्ट्रात लवकरच मविआ आणि भाजपा... title=
राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता

Big Political Happenings Expected In Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 2019 साली झालेला पहाटेचा शपथविधी तसेच 2022 साली शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट या दोन्ही नाट्यमय घटना आजही राज्यातील प्रत्येकाच्या लक्षात आहेत. मात्र या दोन्ही घटनांपेक्षाही मोठा राजकीय भूकंप लवकरच राज्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सहा महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल लागल्याचं पाहायला मिळालं आहे. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात मत दिलं. तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळालं. या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला आहे. असं असतानाच आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

लवकरच ऑपरेशन लोटस?

महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने केल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीचे काही खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेत्याचं म्हणणं आहे. लवकरच हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्याने दिली आहे. मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळेच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निवडून आलेले कोणते खासदार भाजपामध्ये जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं झालं तर हा 2019 च्या राजकीय नाट्यापेक्षा मोठी घडामोड असेल असं मानलं जात आहे.

सध्या राज्यात कोणाचे किती खासदार?

भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार, विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. मात्र हे खासदार नेमके कोण यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लोकसभेतील सर्वाधिक खासदार संख्या असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोखाल दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 खासदार आहेत. 2024 साली एप्रिल-मे महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 30 जागांवर विजय मिळवला. यापैकी काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत निवडणूक लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच 9 खासदार निवडून आले. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या 10 जागांपैकी त्यांनी 8 खासदार निवडून आणले. दुसरीकडे भाजपाला 9 जागी विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागी विजय मिळवता आला. एक अपक्ष उमेदवार जिंकून आला. 

कोणाला किती टक्के मतं?

मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला एकूण मतदानाच्या 26.18 टक्के मतं मिळाली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 16.92 टक्के मतं मिळाली. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10.27 टक्के तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3.60 टक्के मतं मिळाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16.72 टक्के मतं मिळाली. तसेच शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेमध्ये 12.95 टक्के मतं मिळाली.