मारुतीराया तुझा जन्म कुठला? हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला

 देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो.  

Updated: May 28, 2022, 09:05 AM IST
मारुतीराया तुझा जन्म कुठला? हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद पेटला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : त्र्यंबकेश्वरमध्ये आता हनुमान जन्मभूमीवरून नवीन वाद निर्माण झाल्याची चिन्हं आहेत. हनुमानाची जन्मभूमी ही किष्किंधा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केला आहे. तर, त्र्यंबकेश्वरमधील अंजनेरी ही तपोभूमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

हनुमानाचे जन्मस्थान किष्किंदा आहे की अंजनेरी यासंदर्भात विद्वानांनी लेखी पुरावे मांडावे असं त्रंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी आवाहन केल्याचं पाहायला मिळतं. (big dispute on haunman birth place nashik trimbakeshwar)

नाशिकमधील महंतांची हनुमान जन्मस्थळावरून मतमतांतरं झाल्यानं नवीन वादाला तोंड फुटणार असंच चित्र स्पष्ट दिसत आहे.

हनुमानाचं जन्मस्थान देशात कुठे आहे, यावरून देशाच्या उत्तरेकडे सध्या मोठा वाद पेटला आहे. देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो.  त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत. जिथं एका चर्चेचं आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आलं होतं. जिथं किष्किंधाचे गोविंदाचार्यही इथं आले होते. शिवाय काही अभ्यासकांनीही इथं हजेरी लावली. 

तिथेच काही जुने संदर्भही सादर करण्यात आले. वाल्मिकी रामायणाचेही संदर्भ इथं देण्यात आले आणि अंजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचं यातून स्पष्ट झालं. तर, किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचं समोर आलं. 

अंजनेरी नगरी इथं केवळ तपोभूमी असून हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले, याच शास्त्रोक्त चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे.