भीमा कोरेगाव दंगल । आमची चूक काय - गावक-यांचा प्रश्न

  महार सैनिकांच्या शौर्याची साक्ष देणारा विजयस्तंभ पुणे जिल्ह्यातल्या पेरणे गावात आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधीही वढू गावात आहे. या दोन्ही स्थानांचा आणि भीमा कोरेगावचा तसा काही संबंध नाही. मात्र एक जानेवारीच्या घटनेची सर्वाधिक झळ बसलीय ती भीमा कोरेगावला. या दंगलीत गावक-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. त्यामुळे आमची चूक काय असा प्रश्न करत गावक-यांनी मदतीची मागणी केली आहे. 

Updated: Jan 7, 2018, 10:58 AM IST
भीमा कोरेगाव दंगल । आमची चूक काय -  गावक-यांचा प्रश्न  title=

 नितिन,पुणे :  महार सैनिकांच्या शौर्याची साक्ष देणारा विजयस्तंभ पुणे जिल्ह्यातल्या पेरणे गावात आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधीही वढू गावात आहे. या दोन्ही स्थानांचा आणि भीमा कोरेगावचा तसा काही संबंध नाही. मात्र एक जानेवारीच्या घटनेची सर्वाधिक झळ बसलीय ती भीमा कोरेगावला. या दंगलीत गावक-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. त्यामुळे आमची चूक काय असा प्रश्न करत गावक-यांनी मदतीची मागणी केली आहे. 

हिंसाचाराच्या खुणा   

 एक तारखेच्या घटनेत नागेश गव्हाणे यांचं सोमेश्वर हॉटेल, हॉटेल मधील टेबल, खुर्च्या, फ्रिज, भांडी सर्व जाळून टाकण्यात आलं. अगदी पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थही शिल्लक राहिले नाहीत. दिवाळीतच गव्हाणे यांनी दहा - बारा लाख खर्च करून हॉटेलचं नूतनीकरण केलं होतं. आता दोनच महिन्यात पुन्हा हॉटेलचं नूतनीकरण करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. अगदी पेंट आणि नवीन वायरिंग करण्यापासून सर्व काही नव्यानं करावं लागणार आहे. त्यासाठी पुन्हा दहा - बारा लाखाचा भुर्दंड गव्हाणे यांना बसणार आहे. लहानसं हॉटेल चालवणाऱ्या गव्हांणेंसाठी ही मोठी आपत्तीच ठरलीय... 

सारं उद्ध्वस्त 

अपंग असलेल्या बबन गव्हाणे यांची स्थिती तर आणखीनच बिकट... अपंग असल्यानं उदरनिर्वाहासाठी बबन गव्हाणे लहानशी टपरी चालवत. पण, एक तारखेच्या हिंसाचारात त्यांच्या टपरीचं नुकसान झालंयं त्यामुळं, त्यांच्यासमोर आता रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. 

नुकसानीची भरपाई मिळावी - ग्रामस्थांची मागणी  

एक तारखेच्या हिंसाचारात कोरेगाव भीमा संपूर्ण होरपळून निघलंय. अनेक हॉटेल, दुकानं, वर्कशॉप, शोरूम जळून खाक झालीत. चारचाकी आणि दुचाकी गाड्या तर, शेकडोंच्या संख्यने जाळण्यात आल्यात. संपूर्ण गावात कोठेही जा, जळालेल्या गाड्या आणि दुकानाचं दिसतात. गावाचं २५ ते ३० कोटींचं नुकसान झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

जळालेली वाहनं आणि दुकानं - हॉटेल हे एक तारखेच्या हिंसाचाराच्या कोरेगाव भीमातील दृश्य जखमा. पण, त्याही पेक्षा मोठा आघात ग्रामस्थांच्या मनावर झाला आहे. घटनेमुळं सर्वच ग्रामस्थ आजही मनात भीतीच घेऊन वावरत आहेत. बरं, वढू आणि विजय स्तंभ असलेल्या पेरणे गावांच्या शेजारचं गाव एव्हढाच कोरेगावचा संबंध. पण त्याचीच मोठी किमंत या गावाला चुकवावी लागली आहे.