आतिष भोईर, कल्याण : शेतकरी संघटनांनी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कल्याण एपीएमसी मार्केटने कडकडकीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे. कल्याण स्टेशन परिसरात नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत आहे. तसेच कल्याण एसटी डेपोमध्येही नेहमीप्रमाणे कामावर जाणाऱ्या लोकांची आणि बाहेरगावी जाणाऱ्या बसेसची गर्दी कमी आहे.
आजच्या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांसह कामगार संघटनांनी तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. परंतु सकाळी एपीएमसी वगळता सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून आले. कल्याणच्या प्रमुख ठिकाणी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
गेल्या 12 दिवसांपासून शेतकरी संघटनांचे नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत अनेक बैठका सरकारसोबत झाल्या आहेत. पण अजूनही कोणताही मार्ग निघालेला नाही. आता बुधवारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.