प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात (Bhandara crime) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर दोन दिवस सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तब्बल 15 दिवसांनी मुलीने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Bhandara Police) पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
बहिणीसोबत भांडण झाल्यानंतर निघून आलेली एक अल्पवयीन मुलगी भंडारा बस्थानकावर बसून होती. ती एकटी असल्याचे पाहून तिला फुस लावून आरोपीने मित्राच्या रूमवर नेत तिच्यावर दोन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना भंडारा शहर परिसरात घडली. 15 दिवसांनंतर या अल्पवयीन पीडितेने भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या प्रकरणी भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 5 आरोपींना अटक केली आहे. तर आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
आई वडील काम कामासाठी बाहेर जाऊ देत नाहीत तर डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याचा राग मनात धरून पीडित अल्पवयीन मुलगी बहिणीसोबत भांडण झाल्यानंतर घराबाहेर पडली होती. त्यावेळी तिचे आई वडील बाहेरगावी गेले होते. 27 जून रोजी अल्पवयीन मुलगी घरातून एकटीच बाहेर पडली आणि भंडारा बसस्थानकावर येथून थांबली. मुलीला एकटे पाहून दोन तरुणांनी तिच्याजवळ येत विचारपूस केली. त्यानंतर दोघेही तिला कोरंभी येथे फिरायला घेऊन गेले. त्यानंतर दोन आरोपींनी मुलीला तिसऱ्या मित्राच्या घरी नेले आणि आणखी दोन मित्रांना तिथे बोलावून घेतले. त्यानंतर तिने बसस्टॉपवर जाण्याचा आग्रह धरला. मात्र आरोपींनी तिच्यावर बळजबरी करत सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी तिला बसस्टॉपवर सोडलं. पुन्हा आरोपी 10 वाजता तिच्याकडे गेले आणि तिला मित्राच्या घरी घेऊन गेले. जेवण झाल्यावर दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला बसस्टॉपवर सोडलं
तिसऱ्या दिवशी पीडित मुलगी तिच्या गावी गेली आणि तिने तिच्या वडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करत तात्काळ पाच आरोपींना अटत केली आहे. पवन निखार, हितेश निनावे, करण खेताडे, रॉनी कोटांगले, नितेश भोयर अशी आरोपींची नावे असून सर्वजण हे भंडाऱ्यातील आहेत.