मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्यानं घेतला गळफास, मृतदेह ताब्यात घेण्यास आंदोलकांचा नकार

Beed Farmer Sucide: शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 31, 2023, 01:55 PM IST
मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्यानं घेतला गळफास, मृतदेह ताब्यात घेण्यास आंदोलकांचा नकार  title=

Beed Farmer Sucide: मराठा आरक्षण आंदोलनाला दिवसेंदिवस उग्र रुप धारण होतंय. एकीकडे मराठा समाज आक्रमक होतोय, तर दुसरीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आपलं जीवन संपवत असल्याच्या घटना समोर येतायत. त्याच संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील गांधनवाडीचे ४५ वर्षीय शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. 

शेतकरी बाळू धारीबा पाचपुते यांनी घरी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे.  त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आत्महत्येनंतर मराठा आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आहेत. 

मराठा आंदोलकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. तसेच बाळू धारीबा यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. 

दोन तरुणांची आत्महत्या 

शिर्डीच्या संगमनेर तालुक्यातल्या झोळे गावात एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केलीय. आरक्षण मिळत नसल्याने फाशी घेत असल्याची चिट्ठी लिहून सागर भाऊसाहेब वाळे या तरुणाने आत्महत्या केली..आम्ही जातो आमच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा असं चिठ्ठीत लिहून घराच्या मागच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये त्याने गळफास घेतला. तर दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या पोखरी गावात एका 23 वर्षाच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. शुभम गाडेकर असं या तरुणाचं नाव असून गळफास घेत त्याने आपलं जीवन संपवलंय.