घरात अल्कोहोलिक चॉकलेट ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते अटक

घरात  अल्कोहोलिक चॉकलेट ठेवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा....

Updated: Sep 3, 2021, 07:30 AM IST
घरात अल्कोहोलिक चॉकलेट ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते अटक title=

मुंबई : महाराष्ट्रात मद्यपान करण्यास आणि घरात दारू ठेवण्यास बंदी नाही. पण तुम्ही घरात अल्कोहोलिक चॉकलेट ठेवत असाल तर तुम्हाला अटक देखील होवू शकते. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस मोठ्या प्रमाणात अल्कोहोलिक चॉकलेट जप्त करतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरातून 46.5 किलो वजनाचे दारू चॉकलेट जप्त केले. त्याची किंमत 4.31 लाख सांगितली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील सध्याची राज्य उत्पादन आणि दारूबंदी व्यवस्था अल्कोहोल चॉकलेटचे उत्पादन, विक्री आणि घरात ठेवण्यास परवानगी देत नाही. जर या गोष्टींचा साठा करून ठेवण्याची परवानगी दिली तर अल्पवयीन मुलांनी व्यसनाची सवय लागू शकते. 

दरम्यान, 23 ऑगस्ट 2021 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे आणि प्रसाद सास्तूरकर यांच्या पथकाने एका दुकानावर छापा टाकला. येथे अल्कोहोलिक चॉकलेट डेन्मार्कमधून आयात केली जात होती. यातील काही चॉकलेट्सचं वजन 187 ग्रॅम इतकं आहे. शिवाय  12 तुकड्यांची किंमत 1 हजार 650 रुपये आहे. 

अल्कोहोलिक चॉकलेटची विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून 175 अल्कोहोलिक चॉकलेटची पाकिटं जप्त केली आहेत. या प्रकरणी 25 ऑगस्ट रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.दरम्यान, अल्कोहोलिक चॉकलेट जप्त करण्यासाठी वेळो-वेळी कारवाई होते. 

डिसेंबर 2019 साली एका वर्दळीच्या ठिकाणी छापेमारी करत 18 रूपयांची अल्कोहोलिक चॉकलेट जप्त करण्यात आले. 2012 मध्ये वरळी येथील 53 वर्षीय चॉकलेट व्यावसायिका प्रीती चंद्रायणी हिच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरी मद्यपी चॉकलेट बनवल्याप्रकरणी छापा टाकून ताब्यात घेतले.