आतिश भोईर, कल्याण : सरकारने मंदिरे उघडावी या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी जरीमरी देवी मंदिरासमोर घंटानाद करत ठिय्या आंदोलन केलं.
सरकारने बियर बार आणि अवैध धंदे सुरू केले मात्र मंदिरे उघडली नाहीत. मंदिर आणि जिम लोकांची गरज आहे. मात्र सरकारने फक्त स्वतःचे घर चालवण्यासाठी बार आणि अवैध धंदे सुरू केले असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. लवकारात लवकर मंदिरे उघडण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे.
मुंबईसह राजभरात मोठ्या मोठ्या मंदिरांसमोर भाजपकडून आंदोलन सुरु आहे. मंदिर भक्तांसाठी खुली करण्याची मागणी भाजपने केली आहे. दुसरीकडे राज्यपालांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिर उघडी करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सिद्धीविनायक मंदिरासमोर आज विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.