बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग

Baramati AI for Sugarcane: जमिनीची सुपीकता पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो. हवामान बदलांमुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखता येतात पिकांवर पडणारे कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव ही टाळता येतो. महत्वाचे म्हणजे शेतीचे व्यवस्थापन योग्य वेळेत करता येते.

Pravin Dabholkar | Updated: Jun 23, 2024, 07:38 PM IST
बारामतीचा विकास जोरात! AI मुळे उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढले; देशातील पहिलाच प्रयोग title=
Baramati AI for Sugarcane

कैलास पुरी, झी 24 तास पुणे: बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत ऊस उत्पादन वाढवणारा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. एआय तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीचं उत्पन्न वाढवण्याचा देशातला हा पहिला प्रयोग आहे. 

तुम्ही पाहत असलेल्या ऊसाचे उत्पादन ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत घेण्यात आले. एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे उसाच्या उत्पादनात 30 टक्के वाढ झाली आहे. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. 

आधुनिक शेती विस्तार प्रकल्प

या तंत्रज्ञानाचा राज्यातील शेतकऱ्यांनी उपयोग करावा, यासाठी शरद चंद्र पवार आधुनिक शेती विस्तार प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा पुण्यात पार पडला... एआय तंत्रज्ञानामध्ये उपग्रह तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान संवेदक तंत्रज्ञान आणि न्यूट्री सेल्स आयओटी किटचा वापर केला जातो. 

जमिनीची सुपीकता, पोषणमूल्य आणि दर्जा 

उपग्रह तंत्रज्ञान प्लॉट मॅपिंग स्वयंचलित हवामान केंद्र आयओटी सिंचन प्रणालीचा वापर यामुळे शेतीमध्ये शास्त्रीय पद्धतीने खत आणि पाण्याचे व्यवस्थापन करता येते. जमिनीची सुपीकता, पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो. हवामान बदलांमुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखता येतात पिकांवर पडणारे कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव ही टाळता येतो. महत्वाचे म्हणजे शेतीचे व्यवस्थापन योग्य वेळेत करता येते.

उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न

ऊस हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे सुरुवातीला उसावर हा प्रयोग करण्यात आलेला आहे लवकरच तो इतर पिकांवरही राबवण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी होईल आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा

बारामती मधल्या कृषी विज्ञान केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. आता शरदपवार आधुनिक शेती विस्तार प्रकल्पाच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांसाठी राबवला जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे...!