महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन मिळाला आहे.

Updated: Jun 27, 2018, 09:16 PM IST

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना जामीन मिळाला आहे. डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी मराठेंना अटक करण्यात आली होती. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मराठेंना जामीन मंजूर झाला. पुण्याचा विशेष जिल्हा न्यायालयानं मराठेंना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर मराठे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी मराठेंनी जामिनासाठी अर्ज केला होता. मराठेंची पोलीस कोठडी सरेंडर करून न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. मागच्या बुधवारी मराठेंना अटक झाली होती.

मराठेंच्या अटकेवरून टीका

रवींद्र मराठेंना अटक करण्यात आल्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेंनी सरकार आणि पोलिसांवर टीका केली होती. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मराठेंच्या अटकेबाबत काहीही माहिती नाही म्हणणारे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. पीक कर्ज वाटपाच्या इनक्वायरीवर मराठे होते आणि त्यांनी यासगळ्या प्रकरणातला फोलपणा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

नोटबंदीच्या काळात भाजप अध्यक्ष अमित शाह संचालक असलेल्या बँकेत जास्त नोटा बदलून देण्यात आल्या. वेणुगोपाल धूत यांना दिलेल्या कर्जामध्ये आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांचं नाव आलं. अमित शाह आणि चंदा कोचर यांच्यावर कारवाई होत नाही मग रवींद्र मराठेंना अटक कशी होते, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप शरद पवारांनी पुण्यात केली. पुणे पोलिसांसह शरद पवारांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं.

'मराठे' अटक प्रकरणात गृहखात्याचे पुन्हा तसेच धिंडवडे निघत आहेत. आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब आहेत. ते त्यांच्या पक्षाचे निष्ठावान सेवक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण वेळ पक्षविस्तारांत, निवडणूक लढवण्यात जात असल्याने त्यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. याचा गैरफायदा फडणवीसविरोधी गटाने घेतलेला दिसतोय. अशी टीका सामना मधून करण्यात आली आहे.