श्रीकांत राऊत, यवतमाळ, झी मीडिया : बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लेंगी नृत्याची धूम असून आर्णी येथे राज्यस्तरीय लेंगी महोत्सवात एकाहून एक नृत्य सादर होतंय.
डफाच्या तालावर समूह नृत्य.... गाण्याच्या ठेक्यावर इथं रंगलाय लेंगीचा अनोखा खेळ... यवतमाळ जिल्ह्यातील तांड्या तांड्यावर सध्या लेंगी नृत्य रंगतंय. हातात हात गुंफून बंजारा समाज गोरमाटी गाण्याच्या ठेक्यावर लेंगी खेळू लागलेत. डफडीच्या आवाजात उत्तमोत्तम नृत्याविष्कार इथं रंगलाय.
लेंगी हा बंजा-यांचा अनोखा नृत्यप्रकार आहे. लेंगी गीतातून देव-देवतांना बंजारा बांधव आवाहन करतात. या माध्यमातून वाईट गोष्टी आणि कुप्रथांवर देखील प्रहार केल्या जातो. समाजातील अंधश्रद्धा, व्यसन, बेटी बचाओ बेटी पढाओ, हूंडाबळी, शिक्षणाबाबत लेंगी गीतातून जागृती करण्यात येतेय.
जिथं ऐक्य तिथं ईश्वराचा वास असतो. तीच आनंद नगरी होय. या वचनाची अनुभूती सामूहिक लेंगी नृत्यातून येते. सत्य आणि तथ्यावर विसंबलेले तत्त्वज्ञान रंग-रसातून गोरमाटीर होळीत दिसून येतं.