अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे.
कॉलेजमध्ये शिकत असलेल्या निखट शेखला प्रतीक्षा आहे तिच्या भावी जोडीदाराची... लग्न होण्याआधीच 'ट्रिपल तलाक'वर न्यायालयानं बंदी घातल्यानं तिला आनंद झालाय. 'ट्रिपल तलाक'नंतर मुस्लीम समाजातल्या आणखी एका प्रथेवर बंदी यावी, अशी तिची इच्छा आहे. मुस्लीम समाजात बहुपत्नीत्वाला मान्यता आहे. ही प्रथाही रद्द व्हावी, अशी निखटसह अनेक मुस्लीम महिलांची मागणी आहे. ही मागणी उघडपणे मांडायला आता त्या पुढे आल्या आहेत.
पूर्वीच्या काळी सुरू झालेली बहुपत्नीत्वाची प्रथा आजही कायम आहे.... या प्रथेचा जाच अर्थात महिलांनाच सहन करावा लागतो.... त्यामुळे आता यापुढे हा त्रास नको, असं या सगळ्या तरुणींचं म्हणणं आहे.
सध्या तरी न्यायालयानं ट्रिपल तलाकवर बंदी घातलीय. बहुपत्नीत्व आणि हलाला या प्रथांवर नंतर सुनावणी होणार आहे. पण ट्रिपल तलाकचा निर्णय आल्यानंतर मुस्लीम महिलांच्या आशा आणखी पल्लवित झाल्यात.