सावंतवाडी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी आपण नेमके कुठे आहोत याचा विचार करावा, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी सावंतवडी इथे केली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, तरीही वरिष्ठ स्तरावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यानंतर विधानसभा होणार आहेत या सर्व काळात निश्चितच शिवसेनेला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय. भाजपने सत्तेत आल्यास राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राम मंदिरबाबत बोलायला भाजप तयार नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर टीका केली. यावेळी तुम्ही मंदिर बांधताय का, की आम्ही बांधू, असे उद्गार काढले. यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी टोला लगावला होता. त्यानंतर खासदार राऊत यांनी त्याला प्रतिउत्तर दिलेय.
राम मंदिरापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण करा, राणेंनी टोला हाणला होता. राम मंदिराच्या मुद्यावरून नारायण राणे यांनी मोहन भागवत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी राममंदिराचा मुद्दा काढल्याची टीका राणेंनी केलीय. आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग राममंदिराचं बघा असा टोलाही राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.