JNPT HIGHWAY BADLAPUR TUNNEL : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम 2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. माथेरानच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या या महामार्गात येणाऱ्या बोगद्याची लांबी साडेचार किलोमीटर आहे. या बोगद्यात दोन मार्गिका असणार आहे.
सध्या या बोगद्याचे पनवेल आणि बदलापूर भागातील बेंडशीळ अशा दोन्ही बाजूने सुरू आहे. जुलै 2025 ला या बोगद्याच काम पूर्ण होणार आहे. आमदार किसन कथोरे आणि प्रकल्प संचालक यांनी आज या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. या महामार्गामुळे बदलापूर आणि पनवेल हे अंतर अवघ्या पंधरा मिनिटात पार करता येणार आहे.
मुंबई - वडोदरा - जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातून जात आहे. या महामार्गामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. यामुळे हा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी माथेरानच्या पर्वतरांगातून बोगदा खोदला जात आहे. जून 2025 पर्यंत या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे टार्गेट होते. मात्र, आता जुलै 2025 पर्यत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा दीड तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटांत होणार आहे. बदलापूर ते पनवेल हे जवळपास 38 किमीचे अंतर आहे. बदलापूर कटाई रोड मार्गे तळोजा बायपास द्वारे खोणी तलोळा मार्गे पनवेलला जाता येते. मात्र, या बोगद्यामुळे वळसा न घालता थेट बोगद्यातून अवघ्या 15 मिनिटांत हा प्रवास होणार आहे.
औद्योगिकदृष्ट्या हा महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज दिला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडले जाणार आहेत. अंबरनाथ तालुक्यातील प्रवाशांना देखील याचा फायदा होणार आहे. नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.