'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर

Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राजीव कासले | Updated: Aug 26, 2024, 03:59 PM IST
'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर title=

Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम आरोपी अक्षय शिंदेला Accused Akshay Shinde) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. शिवाय या प्रकरणात कलमांमध्ये वाढ करण्यात आली असून कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलेत.आणि विशेष म्हणजे या प्रकरणात  शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही कोर्टाने आरोपी करण्यात आलं असून ते फरार आहेत. दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणाचा अहवाल (Badlapur Case Inquiry Report) समोर आलाय. शाळेतील सीसीटीव्हीचं फुटेज 15 दिवसांपासून गायब असल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस केल्याचं केसरकरांनी म्हटलंय. अहवालावर लवकरच निर्णय घेणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पॅनिक बटणाची व्यवस्था केली जाणार असल्याचं ते म्हणाले. दोषींवर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहितीही केसरकरांनी दिली.

काय म्हणाले दीपक केसरकर?
बदलापूर प्रकरणात दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेत दोन सेविका होत्या, लहान मुलांना शौचालयात घेऊन जाण्याचं त्या काम करतात, मात्र चौकशी दरम्यान दोन्ही सेविका अनुपस्थित होत्या. जर त्या तिथे उपस्थित असत्या तर हे सगळं प्रकार घडलं नसतं असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात दोन्ही सेविकांना सहआरोपी म्हणून कारवाई व्हावी असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

गेल्या 15 दिवसांचं शाळेचं सीसीटीव्ही फुटेज नाही, शिक्षण विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तसंच मुख्याध्यापकांना हा प्रकार माहित असातनाही त्यांनी सांगितलं नाही. म्हणून त्यांच्यावर पोस्कोअंतर्गत कारवाई करावी, शाळेच्या मॅनेजमेंटला सांगून त्यांनी जर कारवई केली नाही तर त्यांच्यावरही पोस्को 19 आणि 21 कलम लागू होतील, असंही केसरकर यांनी सांगितलं आहे. 

मुलींच्या कुटुंबियांची भेट घेणार असून पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबादीर मी घेत आहे, तिचं पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझी असल्याचंही दीपक केसरकरांनी सांगितलं. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10  लाखाची मदत केली जाईल आणि प्रयत्न झालेला आहे तिला 3 लाख मदत करणार, दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येईल. मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ असंही केसरकर यांनी म्हटलंय. 

चौकशी समितीच्या अहवालात काय?
पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी वर्ग शिक्षकांना हा प्रकार सांगितला होता. इतकंच नाही तर शाळेच्या मुख्याध्यापकांनाही हा प्रकार सांगितला होता. पण शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. अशी माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे. त्यामुळे शिक्षिका आणि मुख्याध्यापकांविरोधातही पोक्सोच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांना पुरावे गोळा करावे लागणार आहेत, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.