सर्वांना अयोध्येला जाता येणार नाही म्हणून..; राज्यातील 'या' शहरात विशेष किट्सचं वाटप

Ayodhya Ram Mandir: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते 15 जानेवारीपर्यंत घराघरांमध्ये जाऊन राम मंदिर सोहळ्याशी जोडण्यासाठी या विशेष किट्सचं वाटप केलं जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 29, 2023, 06:36 PM IST
सर्वांना अयोध्येला जाता येणार नाही म्हणून..; राज्यातील 'या' शहरात विशेष किट्सचं वाटप title=
22 तारखेला अयोध्येत होणार प्राणप्रतिष्ठा

Ayodhya Ram Mandir Special Kit: अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी उत्तर प्रदेश सरकारबरोबरच केंद्र सरकारने सुरु केलेली आहे. असं असतानाच देशातील वेगवेगळ्या भागांमधून भाविक या सोहळ्यासाठी आयोध्येत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सर्व रामभक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याने वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या सोहळ्याशी भाविकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच एक अभिनव उपक्रम सोमवारपासून छत्रपती संभाजी नगरमध्ये सुरु होत आहे. 

शहरभर फिरणार स्वयंसेवक

1 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान छत्रपती संभाजी नगरमधील घराघरांमध्ये जाऊन राम मंदिर सोहळ्याशी जोडण्यासाठी विशेष किट्सचं वाटप केलं जाणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या नव्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याला सर्वांना जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी घराजवळच्या मंदिरालाच अयोध्या बनवा. तिथेच सर्वांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करा. त्यानंतर जमेल तेव्हा श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी सहपरिवार अयोध्येला जाऊन या असा संदेश देत स्वयंसेवक शहरभर फिरणार आहेत. हे स्वयंसेवक प्रत्येक घरामध्ये या कार्यक्रमाची पत्रिका, अयोध्येतील मंदिराचा फोटो आणि अक्षतांचं वाटप करणार आहेत.

पत्रिका 15 दिवसांमध्ये वितरित करणार

अयोध्येमधून खास दीड लाखांहून अधिक निमंत्रण पत्रिका छत्रपती संभाजी नगरमध्ये आल्या आहेत. राम भक्तांना मागील अनेक दशकांपासून प्रतिक्षा असलेल्या या सोहळ्यासाठी खास अयोध्येमधून छ. संभाजी नगरवासीयांना निमंत्रण आलं आहे. या सर्व पत्रिका 15 दिवसांमध्ये वितरित केल्या जाणार आहेत. 2 पानांच्या पत्रिकेमध्ये जगभरातील रामभक्तांना आवाहन करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या पानावर अयोध्या राम मंदिराची माहिती आहे.

फोटोंचंही वाटप

या पत्रिकेबरोबरच अयोध्येतील मंदिराची दीड लाखांहून अधिक फोटोंचं वाटप केलं जाणार आहे. 22 जानेवारीला हा फोटो घरातील देवघरात ठेऊन त्याची पूजा करावी. सायंकाळी घरासमोर पणत्या, दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा असा या फोटो वाटपामागील हेतू आहे.

22 श्री राम मंदिरांमध्ये आनंदोत्सव

छत्रपती संभाजी नगरमधील 22 श्री राम मंदिरांमध्ये 22 जानेवारीला आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी अक्षताचं वाटप केलं जाणार आहे. तांदळाला हळद, अष्टगंध लावण्यात आला आहे. या पिवळ्या रंगातील 5 क्विंटल अक्षता 16 कलशांमधून आणण्यात आल्या आहेत.