Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडली. यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रुपात आपल्याला लाभला आहे असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
गोविंदगिरी महाराजांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कशाप्रकारे 3 दिवसांचं अनुष्ठान सांगितलेलं असताना 11 दिवसांचं अनुष्ठान केलं यासंदर्भातील माहिती देत मोदींचं कौतुक केलं. "तुम्हाला 3 दिवसाचा उपवास करायचा आहे असं आम्ही सांगितलेलं. तुम्ही 11 दिवस उपोषण केलं. आम्ही 3 दिवस एक वेळेस जेवण्यास सांगितलं होतं. त्यांनी अन्नाचा त्याग केला. असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही काही सामान्य बाब नाही. आम्ही म्हणालो होतो की तुम्ही परेशात प्रवास करता कामा नये. कारण त्याने सांसर्गिक दोष येतात. सांसर्गिक दोषांमुळे त्यांनी काही देशांचा प्रवास टाळला. पण दिव्य देशांचा प्रवास असा केला. नाशिकवरुन सुरुवात करत श्रीरंगमला गेले, रामेश्वरमला गेले. या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणांवरील परमाणूंना घेऊन. संपूर्ण भारतमातेच्या प्रत्येक कोन्यात जाऊन ते जणू काही निमंत्रण देत होते की दिव्य आत्म्यांनो अयोध्येला या आणि आमच्या देशाला महान बनवण्यासाठी आशिर्वाद द्या, असं म्हणालात," अशा शब्दांमध्ये गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.
पंतप्रधानांच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. "आम्ही तुम्हाला 3 दिवस जमीनीवर झोपण्यास सांगितलं होतं. तुम्ही या थंडीत 11 दिवसांपासून जमीनीवर झोपत आहात. मित्रांनो ब्रम्हाजीने सृष्टीला निर्माण केलं तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता. तो भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे. तप तप इती! आमच्या गुरुंचे गुरु परगुरु कांचीचे परमाचार्यजी महाराज करायचे तपश्चर. आज तपाची कमी होत आहे. आम्ही आज तो तप तुमच्यात पाहिला. ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक राजा आठवतो ज्यामध्ये हे सारं काही होतं. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज!" असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
गोविंदगिरी महाराज इतक्यावरच न थांबता त्यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. "लोकांना कदाचित ठाऊक नाही. जेव्हा ते मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी श्री शैलमवर गेले तेव्हा 3 दिवसांचा उपवास केला. 3 दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी म्हटलं, मला राज्य नाही करायचं. मला संन्यास घ्यायचा आहे. मी शीवाच्या तपश्चर्येसाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत नेऊ नका. त्यांच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले की हे सुद्धा तुमचं कार्य आहे. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं. तुम्हाला भारत मातेची सेवा करायची आहे," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले.
"मी स्वत:ला श्रद्धेच्या बाबतीत कधी भावूक होत नाही. मात्र काही ठिकाणं अशी असतात की आपोआप आपण नतमस्तक होतो. असे एक स्थान या उच्च पदस्थ राजश्रीने दाखवलं तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराजांची आठवण झाली. त्यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं की निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी... आपल्याला आज एक श्रीमंत योगी प्राप्त झाला," असं गोविंदगिरी महाराज म्हणाले. "मी आज या ठिकाणी यासाठी उभा आहे की एवढ्या सर्व सन्मानिय लोकांची परवानगी घेऊन, आशिर्वाद घेऊन. त्यांचं हे तप पूर्ण करण्यासाठी आणि सांगता करण्यासाठी तुम्ही ओमकारचा घोष करुन समहती दर्शवा," असं गोविंदगिरी महाराजांनी म्हटल्यानंतर सर्व उपस्थित साधू-संतांनी ओमचा जयघोष केला. त्यानंतर गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींना पाणी पाजून त्यांचं उपोषण मोडलं.