क्रीडा अधिकाऱ्याची शिवसैनिकांकडून 'परीक्षा'

इतकच नाही तर कँन्टीनमध्ये अन्नाची अवस्था पाहूनही दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

Updated: May 30, 2018, 07:27 PM IST

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत शिवसैनिकांनी क्रीडा अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून मैदानावर पळवल्याची घटना घडलीय. औरंगाबाद क्रीडा संकुलच्या मैदानावर पळापळ करणारे हे आहेत संकुलाचेच क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे... भर उन्हात त्यांची अशाप्रकारे भागमभाग सुरु आहे आणि याला कारण ठरलीय ते शिवसेनेनं दिलेली शिक्षा... विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत, प्यायला पाणी नाही, निकृष्ट अन्न, वसतिगृहातही सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक तक्रारी क्रीडा संकुलाबाबत आहेत. शिवाय मैदानावर पाणी मारत नसल्याने विद्यार्थ्यांना धावताना धुळीचाही त्रास होतो. या समस्याबाबत शिवसेनेकडून अधिकाऱ्यांना निवेदनं देण्यात आली. मात्र त्याकडं दुर्लक्ष केल्यानं शिवसेनेनं थेट या अधिकाऱ्यांनाच शिक्षा देण्याचा मार्ग स्वीकारला. 

इतकच नाही तर कँन्टीनमध्ये अन्नाची अवस्था पाहूनही दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. यात काहीही गैर नसल्याचं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे सांगतायत. क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी मात्र सावध भूमिका घेतलीय. आश्चर्य म्हणजे शिवसेनेच्या शिक्षेबाबतही त्यांची काही तक्रार नाही. 

शिवसेनेला हा अधिकार कुणी दिला?

सुविधा नाही हे सत्य, विद्यार्थ्यांना त्रास होतेय हेही मान्य. मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला शिवसेनेनं शिक्षा द्यावी हे मात्र अनाकलनीय आहे. शिवसेनेनं या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवाव्यात.  मात्र हे सोडून शिवसेना अधिकाऱ्यांना शिक्षा देतेय, आता या सगळ्याबाबत क्रीडा अधिकारी तक्रार करतात का, अथवा नक्की काय कारवाई पुढं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.