Aurangabad Loksabha Sandipan Bhumre VS Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 19 एप्रिलला पार पडले. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरु असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील अनेक उमेदवार ठरत नसल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरु असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेबाबतचा तिढा आता सुटला आहे. महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेतील वाद अखेर संपुष्टात आला आहे. तसेच यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी सुरु असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संदीपान भुमरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा ! #Shivsena #EknathShinde pic.twitter.com/5qbkZJmagX
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) April 20, 2024
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना या दोघांनीही दावा सांगितला होता. भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होते. तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही लोकसभेची तयारी केली होती. विशेष म्हणजे भाजपने दोन वर्षात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभाही घेतल्या होत्या. मात्र अखेर भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघ दिला आहे. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
दरम्यान सध्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी घोषित केली आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. तर आता महायुती म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. तसेच या मतदारसंघात चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि एमआयएमचे खासदार (औरंगाबादचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार उभा केला आहे.