आमदार राणाजगजितसिंहांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Dec 30, 2019, 03:17 PM IST
आमदार राणाजगजितसिंहांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया उस्मानाबाद : तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांच्यासह अन्य 18 जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यानंतर राणा जगजितसिंह यांच्या मागावर पोलीस असल्याचं सांगण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब पंचायत समितीचे 3 सदस्य शिवसेनेने पळवले असल्याची महिती होती. पाटील यांचे सदस्य बोरगाव -  माळेवाडी ता माळशिरस येथे हिंमतराव पाटील यांच्या बंगल्यावर असल्याचं कळलं. 

यानंतर राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बंगल्यावर पोहचले, तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राणा पाटील यांचे समर्थक आमनेसामने आले. यानंतर या संघर्षाचं रूपांतर मारहाणीत झालं, त्यावेळी राणा पाटील यांनी पिस्तूल रोखून हिम्मतराव पाटील यांना धमकवण्याचा प्रयत्न केला असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. 

यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमा झाल्याने राणा पाटील आणि त्यांच्या लोकांनी तिथून पळ काढला. मात्र यावेळी राणा पाटील यांची एमएच 43 bp 5511 ही एन्डोवर गाडी तिथेच ठेऊन पळ काढला. 

याप्रकरणी अकलूज पोलीस स्थानकात राणा पाटील यांच्यासह 18 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यात उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडणाईक, राणा यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे , दयाशंकर कंकाळ, पोपट चव्हाण यांच्यासह 4 जणांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. 

फिर्याद दाखल करणारे हिम्मतराव पाटील हे उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे काका असल्याची माहिती आहे.

आमदार राणा पाटील यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राणा यांच्यावर कलम 307 , 323, 504 , 452 , 427 143 148 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा नोंद आहे. 

गुन्हा दाखल झाला त्यांचे नावे खालीलप्रमाणे
1) राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील
2) सतीश दंडणाईक
3) प्रणव चव्हाण
4) अरुण चौधरी
5) गणेश भातलवंडे
6) धीरज वीर
7) दयाशंकर कंकाळ
8) मनोगत शिंगारे
9) मेघराज देशमुख
10) दत्तात्रय साळुंखे
11) पोपट चव्हाण
आणि अनोळखी 8 जण