Heatwave : गेल्या काही वर्षात नागपूर, वर्धा, चंद्रपूरमध्ये तापमानाने नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. यंदा तीव्र उन्हाळा जाणवत आहेत. दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे अनेकजण टाळत आहेत. अशातच मुक्या जनावरांनादेखील या उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे एका वाशिम येथील एका शेतकऱ्याने जनावरांचा रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी भन्नाट उपाय शोधला आहे. या शेकऱ्याने म्हशीच्या गोठ्यातच शॉवर लावले आहेत.
विदर्भात उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. माणसांसोबतच जनावरांच्याही अंगाची लाहीलाही होत आहे. अशात दुधाळ जनावरं असतील तर त्यांच दूध कमी होण्याचा धोका असतो. यावर वाशिम जिल्ह्यातील ''भट उमरा'' येथील प्रवीण काळे या युवा शेतकऱ्याने भन्नाट उपाय शोधला आहे.
प्रवीण यांनी म्हशींसाठी चक्क गोठ्यात शॉवरच लावले आहेत. या उपायाने गोठ्याचे तापमान कमी झाले आहे. शिवाय दूध उत्पादनही वाढल आहे. त्यामुळं परिस्थिती कितीही बिकट असली, समस्या कितीही गंभीर असली तरी शेतकरी आपल्या मेहनतीने,अनुभवाने त्यावर उपाय शोधतातच हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे.
हिंगोलीत वाढत्या तापमानाचा फटका दूध संकलनावर होत असल्याचे दिसून येत आहे. हिंगोलीत दूध उत्पादनात 15 ते 20 टक्के घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हिंगोलचे तापमान 42 टक्केपर्यंत पोहोचलय. या तापमान वाढीचा फटका दूध संकलनांवर झालाय. यामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वर्ध्यात पारा 41 ते 44 अंशावर गेला आहे. या उष्णतेच्या झळा प्राण्यांनाही बसू लागलाय. वर्ध्यातील करुणा आश्रमात बिबट्या, अस्वल अशा प्राण्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खास बडदास्थ ठेवली जात आहे. या प्राण्यांसाठी आश्रमात खास कुलर लावण्यात आलेत आहेत.
उकाड्यापासून दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात आज पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. आजपासून देशभरात वळवाच्या पावसाचे संकेतही मिळत आहेत. तेव्हा आगामी पाच दिवसांत 4 ते 5 अंशांनी तापमान कमी होईल. मान्सून लवकरच तामिळनाडूच्या दिशेने येतोय. तेव्हा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आलाय
28 मेपर्यंत मान्सून कर्नाटकात आणि 3 ते 4 जूनच्या आसपास केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.