मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सध्या राज्यात सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रचार सभा जोरदार सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. कार्यकर्तेही प्रचारामध्ये व्यस्त आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचाराचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान काही राजकीय पक्षांना विविध कारणांमुळे आपल्या सभा रद्दही कराव्या लागल्या आहेत. सभा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मान खटाव विधानसभा मतदारसंघातील दहिवाडी इथली सभा रद्द झाली आहे.
ही सभा रद्द झाल्याची माहिती शिवसेनेतर्फे देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे पोहचता आले नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून लोकांशी संवाद साधला. सभेला येता आलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी उपस्थिताची माफी मागितली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाँ. अमोल कोल्हे यांना देखील आपली प्रचार सभा रद्द करावी लागली होती. पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या तीन सभा त्यांनी रद्द केल्या.