विधानसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.  

Updated: Oct 5, 2019, 05:43 PM IST
विधानसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी title=
संग्रहित छाया

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील नाराज मंडळीकडून बंडखोरी झाली आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी या बंडखोरांना अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी न मिळ्याने अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरला आहे. तर भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे. तसेच काँग्रेस आघाडीतही बंडखोरी दिसून येत आहे.

पुण्यात युती आणि आघाडीत बंडखोरी 

पुणे शहरात तीन मतदारासंघात काँग्रेसच्या इच्छुकांनी आघाडीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्याविरोधात काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदार संघात काँग्रेसच्या इच्छुकांनी त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलीय. सदानंद शेट्टी यांनी रमेश बागवेंविरोधात तर कमल व्यवहारे यांनी अरविंद शिंदेंविरोधात बंड पुकारलंय. पुण्यातील ६ मतदारसंघात प्रमुख पक्षांचे १० बंडखोर रिंगणात आहेत. 

सांगलीत भाजपमध्ये बंड

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपत बंडखोरी झाली आहे. भाजपचे विध्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी उर्फ पपू डोंगरे यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज भरला आहे. भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात ' बंडखोरी ' झाली आहे. त्यामुळे भाजप जिल्हा नेत्यांची ' डोकेदुखी ' वाढली आहे. सांगली, जत, इस्लामपूर, मिरज आणि शिराळा या प्रमुख ठिकाणी ही बंडखोरी झाली आहे. त्याचा बंदोबस्त कसा करायचा, याची भाजप वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सोलापुरात आयात उमेदवाला संधी, शिवसेनेत बंड

सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदारांऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत. तानाजी सावंतांच्या खेळीमुळे उमेदवारी कापली गेल्याचं नारायण पाटील यांनी म्हटले. नारायण पाटील यांना डावलल्यामुळे करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता रश्मी बागल यांचे काम न करण्याचा इशारा दिलेला आहे.