दसऱ्यानंतर राज्यात मॅरॅथॉन प्रचारसभा

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा..  

Updated: Oct 9, 2019, 07:38 AM IST
दसऱ्यानंतर राज्यात मॅरॅथॉन प्रचारसभा  title=

मुंबई :  विजया दशमीच्या मुहुर्तानंतर महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आजपासून सर्व पक्षांच्या प्रचारसभांना सुरूवात होत आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. उद्धव ठाकरेंच्या आज चार सभा असून मुख्यमंत्र्यांच्याही तीन प्रचार सभा असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत.

उद्धव ठाकरे संगमनेर, अहमदनगर, श्रीरामपूर आणि पारनेरमध्ये येथे प्रचारसभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूर, देवळा आणि चांदवडमध्ये येथे प्रचारसभा घेणार आहेत. शरद पवारांनी देखील आजपासून सभेला सुरूवात केली असून त्यांच्या बाळापूर आणि मुर्तीजापूर इथे दोन प्रचार सभा होणार आहेत तर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांचीही आज नांदेडमध्ये सभा आहे.

अकोल्यात आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला असून बाळापूर मतदारसंघातील वडेगाव येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. आघाडीत जिल्ह्यातील पाच पैकी दोन मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाले आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांची सभा बाळापूर आणि मूर्तिजापूर या दोन्ही मतदार संघात होणार आहे. बाळापूर हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाटेवर होता मात्र यावेळी राष्ट्रवादीने जोर धरत या मतदारसंघाची मागणी करत हा मतदार संघ मिळवला आहे. यामुळे आघाडीत राष्ट्रवादी पहिल्यांदाच येथून निवडणूक लढत आहे..त्यामुळे शरद पवार यांच्या प्रचारसभेचा मतदारांवर प्रभाव पडणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे जाहीर प्रचार सभा घेतली. काही महिन्यापुर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले निलेश लंके पारनेर मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. दसऱ्याच्या दिवशी लंके यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ शरद पवार यांच्या उपस्थितीत झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.