तिकीट कापलेले खडसे-तावडे भाजपचे स्टार प्रचारक

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Updated: Oct 4, 2019, 11:08 PM IST
तिकीट कापलेले खडसे-तावडे भाजपचे स्टार प्रचारक title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तिकीट न मिळालेल्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. भाजपने ४० स्टार प्रचारकांच्या यादीची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १० सभा तर गृहमंत्री अमित शाह हे २० सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण या सभांचं वेळापत्रक अजूनही समोर आलेलं नाही. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचारासाठी पुन्हा एकदा मोदी कार्डचा वापर होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधला अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

२१ ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे १९ ऑक्टोबरला संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. २४ ऑक्टोबरला या निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.