विनोद पाटील, झी २४ तास, जळगाव : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यात नाव आल्यामुळे अडचणीत आलेल्या शरद पवारांच्या मदतीला एकनाथ खडसे धाऊन आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. खडसेंच्या भूमिकेमुळे पवारांना मोठं नैतिक बळ मिळालं. खडसेंसारख्या भाजपाच्या जुन्या जाणत्या नेत्यानं असं का केलं? याचा हा विशेष वृत्तांत.
मी पाठपुरावा करेपर्यंत पवारांचं नाव या प्रकरणात नव्हतं, त्यामुळे पवारांचं नाव या प्रकरणात आल्यानं मलाही आश्चर्य वाटलं, असं खडसेंनी म्हटल्यानंतर इतरांसोबत भाजपलाही धक्का बसला. एकनाथराव खडसेंनी 'झी २४ तास'वरील मुलाखतीत हा गौप्यस्फोट करताच राज्याच्याच नव्हे तर देशपातळीवर मोठी खळबळ माजली. भाजपा सरकारनं पवारांचं नाव गोवल्याचे आरोप होत असताना त्याच पक्षाचा ज्येष्ठ नेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांची पाठराखण करतो म्हणजे यामागे अनेक अन्वयार्थ दडलेले आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा एकनाथराव खडसेंचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात खडसेंचा पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मात्र गेल्या वेळी स्वतंत्रपणे आणि पहिल्यांदा लढूनही शिवसेनेनं खडसेंना घाम फोडला होता. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांचा केवळ १० हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. राज्यात युतीचा निर्णय काहीही झाला तरी मुक्ताईनगरमध्ये शिवसेना उघडपणे खडसेंच्या विरोधात काम करणार आहे. त्यामुळे युती झाली तरी त्याचा खडसेंना किती लाभ होणार, याबाबत शंकाच आहे.
मुक्ताईनगरमधील शिवसैनिकांनी अखेरच्या क्षणापर्यंत विरोधातच भूमिका घेतली तर थेट विरोधकांकडेच मदतीसाठी साद घालण्याची खेळी खडसेंनी केलीय. पवारांची पाठराखण करून मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीनं तुलनेनं कच्चा भिडू मैदानात उतरवला तर खडसेंचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, खडसेंविरोधात प्रबळ उमेदवारच मैदानात उतरणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले यांनी केलाय.
खडसेंनी विधानसभेत वेळोवेळी फडणवीस सरकारला धारेवर धरून अडचणीत आणलंय. त्यामुळे मुक्ताईनगरच्या शिवसेनेसह भाजपातील अंतर्गत हितशत्रूही खडसेंच्या पराभवासाठी सक्रिय झालेले आहेत.