सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा कुडाळ मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. राणे आणि भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. कुडाळची जागा शिवसेनेला गेली आहे. शिवसेनेचे वैभव नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र राणेंच्या स्वाभिमान पक्षाने कुडाळमधून स्वतंत्र उमेदवार उतरवला. मात्र, दत्ता सामंत शासकीय कंत्राटदार असल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला.
दरम्यान, सिंधुदुर्गमधील युतीवरील सावट कायम आहे. आमचा उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा शिवसेनेला अधिकार कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपने युती धर्म पाळल आहे. तर शिवसेनेने युतीचा धर्म पाळला नसल्याने आता युद्ध अटळ असल्याचंही ते म्हणाले.
स्वाभिमान विलीनीकरण आणि नितेश राणे यांना उमेदवारी हे निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आहे. कोकणातील पक्ष मजबुतीसाठी हा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. कोकणातील रखडलेले प्रकल्प आता पूर्ण होतील. संदेश पारकर, अतुल रावराणे यांनी पक्षासोबत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.