बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या एक कथित वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा दावा भाजपाने केला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. हा व्हिडीओ एडीट करुन व्हायरल केल्याचे धनंजय यांनी म्हटले होते. याची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहत याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
मी माझ्या १५०० बहिणींचे कन्यादान केले आहे. मी कधीही कोणत्याच महिलेबाबत चुकीच्या शब्दांचा वापर करणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी असल्याचे ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत आपण परळीच्या विकासासाठी लढतोय. याला परळीकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे विरोधकांना पराभवाची भिती वाटू लागल्याने निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंडे म्हमाले. पण मुद्दा भावनिकतेवर घेऊन जाताना इतकीही खालची पातळी गाठू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर बदनामीकारक हातवारे करून महिलेची बदनामी केल्या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम ५०० (महिलांसाठी अपमानकारक शब्द वापरणे ), ५०९ (शाब्दिक छेडछाड) आणि २९४ (अश्लील कृत्य) या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. परळी पोलिसांत जुगलकिशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.