नाणार, रत्नागिरी : नाणारवरुन शिवसेना भाजपचा वरुन किर्तन आतून तमाशा सुरु आहे. अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी युतीवर हल्लाबोल केलाय. नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी अशोक चव्हाण नाणारमध्ये आहेत. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना चव्हाणांनी शिवसेना-भाजपवर तोंडसुख घेतलं. 'उद्योगमंत्री नाणारची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करतात मात्र तसा अधिकार मंत्र्यांना नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. इतकी वाईट अवस्था होऊनही शिवसेना सत्तेत आहे', अशी टीका चव्हाणांनी केलीय.
तसंच नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करुन दहा दिवस उलटले तरी अधिसूचना रद्द का झाली नाही? असा सवालही चव्हाणांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या घरादारावर आणि शेतावर नांगर फिरवून विकास नको, असंही चव्हाण म्हणालेत.
इंग्रज काळापेक्षाही जास्त दंडेलशाही सुरु आहे... सरकारकडून शेतकऱ्यांचा जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत असून इंग्रजांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरु असल्याचा आरोप चव्हाणांनी केला.
सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत... तुम्ही एकजुटीने राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.