पंढरपूर : आनंदवारी. महाराष्ट्राचा महासोहळा. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या पात्रात स्नान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन हा मराठी मनाचा नेम. लाखो मैल पायी वारी करणाऱ्या वारकरी, पांडुरंगाचंदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात १५ लाखांच्या आसपास वारकरी दाखल झालेत. रोषणाईने उजळून निघालेला मंदिर परिसर आणि भाविकांची दर्शन प्रतीक्षा यामुळे मध्यरात्रीपासून पंढरी विठूनामाच्या जयघोषाने निनादून गेली आहे.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis offers prayers at Vitthal temple in Pandharpur, on the occasion of ‘Ashadhi Ekadashi’. pic.twitter.com/PVzDGT60U6
— ANI (@ANI) July 11, 2019
पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जवळपास ४ ते ५ किलोमीटर रांगेत १५ ते १७ तास थांबून दर्शन झाल्यावर वारकऱ्यांचा एकच जयघोष विठ्ठल मंदिरात घुमत आहे. पंढरपूर अवघे वारकऱ्यांच्या महापुरात बुडाल्याचा प्रत्यय येत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या पाडुरंगाचे दर्शन होणे हे मोठे भाग्यच. या दर्शनासाठी वारकरी तासनं तास रांगेत उभे असतात. आणि अखेर जेंव्हा दर्शन होतं त्यावेळी त्यांना होणारा आनंद हा अतीउच्च असा असतो, अशी प्रतिक्रिया येथे येणारा प्रत्येक जण देत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपुरात विठ्ठल-रुक्मीणीची शासकीय महापूजा झाली. तब्बल दीड तास ही पूजा सुरू होती. पहाटे अडीचच्या सुमारास पांडुरंगाच्या पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. चंदनाचा टीळा लावल्यानंतर देवाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली. त्यानंतर वारकऱ्यांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा सलग चार दशके वारी करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला आहे. ६१ वर्षीय विठ्ठल मारूती चव्हाण आणि सौ. प्रयाग विठ्ठल चव्हाण यांना मानाचा वारकरी होण्याची संधी मिळाली. तसेच पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'रिंगण' या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संत सावता माळी यांच्या अध्यात्मिक, सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनपैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न यावेळच्या अंकात करण्यात आलेला आहे.
मानाचे वारकरी: सौ प्रयाग आणि श्री विठ्ठल मारुती चव्हाण यांना मिळाला महापूजेचा मान!
हे दांपत्य सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर येथील रहिवासी असून सांगवी सुनेवाडी तांडाचे १० वर्षे सरपंच होते. १९८० पासून अर्थात ३९ वर्षांपासून ते सलग वारी करीत आहेत. #Vitthal #विठ्ठल pic.twitter.com/KfQzBnjAkF— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 11, 2019