युवा सेना अध्यक्ष असाल म्हणून... शिवसेना भाजपात आता श्रेयवादाची लढाई

नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

Updated: Mar 16, 2022, 03:14 PM IST
युवा सेना अध्यक्ष असाल म्हणून...  शिवसेना भाजपात आता श्रेयवादाची लढाई title=

मुंबई : विधानसभेत भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. नाशिक येथील अभिनव मंदिर विकास निधी फडवणीस यांनी दिला होता. मात्र, आता पुन्हा अभिनव मंदिर विकासाला निधी देण्यात आला असून त्यावर आमदार यांचे नाव लिहिण्यात आले नाही.

आमदाराचे नाव वगळून खासदार आणि स्थानिक युवा सेना पदाधिकारी यांचे नाव टाकले आहे, असा आक्षेप आमदार फरांदे यांनी घेतला. यावरून आमदार ॲड. आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले.

भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी, नाशिकमध्ये भाजप आमदारांनी एखाद्या विकासाची मांडलेली योजना खासदाराच्या नावाने समाविष्ट करण्यात येते. एकाने सुचविलेले काम शिवसेना आमदाराच्या, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या नावावर जमा होते. हा कसला प्रकार आहे?

इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण करू नका. असाल तुम्ही युवा सेनेचे अध्यक्ष. पण, तुम्ही लोकांच्या कामाचे श्रेय शिवसेनेच्या नावावर करून घेणार का? या गोष्टी अजिबात चालणार नाही असा गर्भित इशारा शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

तर, आपण लोकशाहीत राहतो. दुसऱ्या आमदाराने केलेल्या कामाचे श्रेय आपल्या नावावर घेणे या एका नव्या प्रथेला जन्म देणार का? असा सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

अखेर यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी, यासंदर्भातील माहिती घेऊन या कामाच्या अनुषंगाने आवश्यवक तो बदल केला जाईल असं सांगून या वादावर पडदा टाकला.