17 टक्के मुलांमध्ये एंटीबॉडीज; नकळत होऊन गेला कोरोना

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनिकल चाचणीचा नागपुरातील पहिला टप्पा पूर्ण झालाय.

Updated: Jul 4, 2021, 02:59 PM IST
17 टक्के मुलांमध्ये एंटीबॉडीज; नकळत होऊन गेला कोरोना title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची लहान मुलांवर होणाऱ्या क्लिनिकल चाचणीचा नागपुरातील पहिला टप्पा पूर्ण झालाय. लहान मुलांवरील लस देण्यापूर्वी अर्थात ह्यूमन ट्रायल नागपुरात सुरू झाल्यानंतर लसीचा पहिला डोस देण्यापूर्वी झालेल्या स्क्रिनिंगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ते म्हणजे 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना नकळत कोरोना होऊनही गेला होता. 

या स्क्रिनिंगमध्ये 2 ते 18 वर्ष वयोगटातील 17 टक्के मुलांमध्ये एंटीबॉडीज विकसित झाल्याचं स्पष्ट झालं. स्क्रिनिंगदरम्यान 104 पैकी 18 मुलांमध्ये एंटीबॉडीज तयार झाल्याच आढळून आलं. 

नागपूरात करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचणीपूर्वी 2 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये या एंटीबॉडीज तयार झाल्याची बाब पुढे आली आहे. नागपुरातील मेडिट्रीना रूग्णालयामध्ये 2 ते 6 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 12 ते 18 वर्ष या वयोगटातील मुलांच्या क्लिनिकल चाचण्यांचा पहिला डोस डॉक्टर वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. 

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 12 ते 18 वर्ष वयोगटातील 50 मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. त्यापैकी 10 मुलांमध्ये एंटीबॉडीज आढळल्या. तर 6 ते 12 वर्ष वयोगटातील 34 मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी 5 जणांमध्ये एंटीबॉडीज होत्या. तर 2 ते 6 वर्ष वयोगटातील 20 मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. या गटात 3 मुलांमध्ये एंटीबॉडीज आढळल्या.

नागपूरमधील क्लिनिकल ट्रायल प्रमुख डॉ वसंत खळतकर यांच्या सांगण्यानुसार, "यामध्ये मोठी मुलं बाहेर खेळायला जातात त्यावेळी त्यावेळी ही मुलं विषाणूच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. तर लहान 2-6 वयोगटातील मुलांमध्ये 3 जणांमध्ये अॅटीबॉडीज आढळले असून यांचे पालक फ्रंट लाईन वर्कर्स म्हणजे, डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचारी किंवा पॅरामेडिकल असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालक कामावरून घरी आल्यानंतर त्यांच्याद्वारे मुलांना नकळत संक्रमण झाल्याची शक्यता आहे." 

डॉ. खळतरकर पुढे म्हणाले की, "लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी सोशल डिस्टसिंग, मास्कचा आणि सॅनिटाझरचा वापर करणं बंधनाकारक आहे. त्यामुळे लकांनी मुलांच्या या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे."