आतिष भोईर, कल्याण : रुग्णाला दाखल करण्यासाठी वारंवार स्ट्रेचर आणण्यास सांगूनही एकही कर्मचारी पुढे न आल्याने अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनीच स्वतः स्ट्रेचर आणत रुग्णाला नेल्याचा संतप्त प्रकार कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात घडला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.
कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणारे गोविंद मोरे हे काल गौरीपाडा तलावात पडले. त्यावेळी तिकडूनच जाणाऱ्या राजदीप गायकवाड यांना तलावाशेजारी गर्दी दिसून आली. तिकडे जाऊन त्यांनी पाहिले असता आपल्या मित्राचे वडील तिकडे पडलेले असल्याचे दिसून आले. राजदीप यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना रिक्षातून रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. त्यावेळी तिकडे बसलेल्या कर्मचाऱ्यांना आपण स्ट्रेचर आणण्यासाठी वारंवार आवाज दिले. मात्र एकही जण स्ट्रेचर घेऊन पुढे आला नाही.
अखेरीस तेच स्ट्रेचर घेण्यास आतमध्ये गेलो आणि मोरे यांना कसेबसे स्ट्रेचरवर ठेवून आतमध्ये आणल्याची माहिती राजदीप गायकवाड यांनी दिली. गोविंद मोरे यांना स्ट्रेचरवर ठेऊन आतमध्ये आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याआधी देखील रुक्मिणीबाई रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. पण या रुग्णालयावर कोणतीची कारवाई होताना दिसत नाही. रुग्णालयातील कर्मचारी आणि काही डॉक्टर्स निष्काळजीपणे वागत असतात. अशा तक्रारी नागरिक नेहमी करत असतात. पण प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हाच खरा प्रश्न आहे.