आजपासून आंगणेवाडी जत्रेला सुरुवात

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होतेय.

Updated: Jan 27, 2018, 09:15 AM IST
आजपासून आंगणेवाडी जत्रेला सुरुवात  title=

आंगणेवाडी, सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होतेय.

स्थानिक आंगणे मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रेची पूर्ण तयारी झालीय. आज पहाटे चार वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली असून त्यासाठी नऊ रांगांची व्यवस्था करण्यात आलीय.

भाविकांना अर्ध्या तासात दर्शन मिळू शकेल, असा विश्वास देवस्थान मंडळाने व्यक्त केलाय. यावर्षी सुमारे आठ लाख भाविक दर्शनाला हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.

आकर्षक रोषणाईने भराडी मातेचा मंदिर परिसर सजला आहे. स्थानिक आंगणे मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसली आहे.  २७ जानेवारी रोजी होणाऱ्या यात्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, सिंधु सरस महोत्सव, फ्लावर शो यासह सामाजिक संस्था व पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे. 

आंगणेवाडी यात्रोत्सव प्रथमच जानेवारी महिन्यात होत असून आजचा प्रजासत्ताक दिन व त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्याने यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.