Anant Chaturdashi 2022 : राज्यात मोठा उत्साह, 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला

Ganpati Visarjan 2022 : भक्तांच्या घरचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा (Ganpati 2022) आज आपल्या गावाला जाणार आहे. आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. (Ganesh Visarjan) मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. 

Updated: Sep 9, 2022, 08:11 AM IST
Anant Chaturdashi 2022 : राज्यात मोठा उत्साह, 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला title=

मुंबई : Ganpati Visarjan 2022 : भक्तांच्या घरचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा (Ganpati 2022) आज आपल्या गावाला जाणार आहे. आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. (Ganesh Visarjan) मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्यायत. 9.30 वाजता लालबागचा राजाची आरती होईल. त्यानंतर 10.30 वाजता लालबागाच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक लालबाग मार्केटमधून वाजत गाजत निघणार आहे. त्यानंतर गिरगाव चौपाटीपर्यंतच्या विसर्जन मार्गावर लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची प्रचंड गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे.  

तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजतगाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहर आणि उपनगरांतील चौपाट्या, तलाव, नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे. विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलीय. 

मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची आरती आठ वाजता होईल. त्यानंतर मूर्ती बाहेर काढण्यात येईल. मेघवाडीमधून फिरून लालबागमधल्या मुख्य रस्त्यावर मूर्ती आणणार. त्यानंतर हळूहळू गिरगावच्या दिशेनं विसर्जनासाठी मुंबईचा राजा रवाना होईल. वाजत गाजत राजाची विसर्जन मिरवणूक निघेल.

नागपूरचा बाप्पा विसर्जनसाठी मुंबईत

नागपुरातील एका गणपतीच्या मूर्तीचे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी भक्त गुरुवारी रात्री दुरांतो एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मुंबईला विसर्जन करण्यात येत. देशपांडे ले आऊट येथील नागरिक हा गणपती बसवितात. यंदा टेकडी गणेशाच्या रुपातील गणरायाची मूर्ती बसविण्यात आली होती. वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मंडळाची थीम होती. त्यानुसार मंडळातील सदस्यांनी मुंबईतच गणरायाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. गणरायाची मूर्ती घेऊन मंडळ सदस्य दुरांतोने मुंबईकडे रवाना झाले. गणरायाची मूर्ती पाहून रेल्वेस्थानकावरदेखील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पुण्यातील विसर्जन मिरवणूक 

पुण्यातील पाच मानाच्या गणपतीचे आज विसर्जन होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक आज अनंत चतुर्दशीला  थाटात निघणार आहे. यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला आहे

श्री स्वानंदेश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 24 फूट इतकी आहे. रथावर 5 कळस बसविण्यात आले आहेत. एलईडी व मोतिया रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध रंगाचे एलईडी लाईटस् देखील वापरण्यात आले आहे.

मनमाडमधून सुटणा-या गोदावरी एक्सप्रेसमध्ये स्थापन झालेल्या गणरायाचा प्रवास संपला. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गोदावरीच्या राजाचं विसर्गजन झालं.  मनमाडला ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. रेल्वे स्थानक परिसरातून विसर्जन मिरवणूक काढली. स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मिरवणूकीत ७५ मीटरचा राष्ट्रध्वज अग्रभागी होता. 

बाप्पा आज गावाला जाणार त्यामुळे दर्शनासाठी गुरुवारी रात्री मोठी गर्दी होती. जळगावातही देखावे पाहण्यासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झालेली. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनाही बाप्पाच्या दर्शनाचा मोह आवरला नाही. त्यांनी त्यांच्या मुलांना बाप्पाचं दर्शन घडवलं. सराफ बाजार मित्र मंडळ या बाप्पाची आरती केली. या बाप्पाचे दागिने कोट्यवधींचे आहेत. कोरोना काळातल्या समाजसेवेबाबत, काशी विश्वेश्वर, देशभक्तीपर संदेश देखावे साकारलेत.