खासदार नवनीत राणा यांचं गरबा- दांडिया नृत्य पाहाच

व्हिडिओ व्हायरल

Updated: Sep 27, 2019, 05:07 PM IST
खासदार नवनीत राणा यांचं गरबा- दांडिया नृत्य पाहाच title=
खासदार नवनीत राणा यांचं गरबा- दांडिया नृत्य पाहाच

मुंबई : लोकसभा निवडणुकीला उभं राहिल्यापासूनच ही निवडणूक जिंकून येईपर्यंत नवनीत राणा चर्चेत होत्या. किंबहुना त्यानंतरही त्या बऱ्याच कारणांनी प्रकाशझोतात राहिल्या. सध्या राणा लक्ष वेधत आहेत, ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे. 

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गरबा आणि दांडिया नृत्याच्या प्रशिक्षणासाठी आणि सरावासाठीच अनेकांनी कंबर कसली आहे. अमरावतीतही अशाच एका शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या शिबीरात सहभागी होत नवनीत राणा यांनी दांडिया नृत्य सादर केलं. 

राणा यांच्या दांडिया नृत्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अतिशय सराईताप्रमाणे त्या हे नृत्य करताना दिसत आहेत. अमरावती येथील प्राईम पार्क लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबीरात त्यांचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. या शिबीरात सहभागी झालेल्या महिलांसोबत राणा यांनी धरलेला ठेका पाहून सर्वांनाच आनंद झाला. 

आयुष शर्मा याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'लवयात्री' या चित्रपटातील एका गीतावर राणा मोठ्या उत्साहात दांडिया नृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ पाहता, खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे, असंच म्हणावं लागेल. नवनीत राणा तर, रास गरबा आणि दांडियासाठी तयार आहेत; पण तुमचं काय? नवरात्रोस्तवाच्या आनंददायी वातावरणासाठी तुम्ही तयार आहात ना?