अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून अमरावतीमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे. पोलिसांनी युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी घरातच स्थानबद्ध केलं आहे. घराबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असून पालकमंत्री, महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. रवी राणा आणि नवनीत राणा काही काळ घराबाहेर आले होते. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ही ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्या म्हणण्यानुसार त्या गेल्या तीन वर्षापासून हा पुतळा बसवण्यासाठी परवानगी मागत होत्या. मात्र त्यांना ही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतरही त्यांनी परवनगी नसताना महाराजांचा पुतळा लावल्याने तो काढण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पहाटे प्रशासनाने काढला.
चार दिवसांपूर्वी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. आज पहाटे राजापेठ उड्डाणपूलावरील पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवला. या सगळ्या प्रकरणी घटनास्थळी तणावाचं वातावरण आहे तर युवा स्वभीमानचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
स्वराज्य सामाजिक संघटनाच्या वतीने अमरावतीच्या इर्विन चौकात मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांचा पुतळा जाळला. अमरावती शहरात आता रवी राणा यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. स्वराज्य सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमरावतीत महानगरपालिका विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.