'केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..'; 'आपण एक गोष्ट विसरतोय' म्हणत खासदाराचं विधान

NDA Government Under Modi Can Fall At Any Time: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदाराने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2024, 08:21 AM IST
'केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..'; 'आपण एक गोष्ट विसरतोय' म्हणत खासदाराचं विधान title=
शरद पवार गटाच्या खासदाराचं सूचक विधान

NDA Government Under Modi Can Fall At Any Time: लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्व करताना भाजपाने 400 पारची घोषणा दिली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना 300 चा आकडाही गाठता आला नाही. दुसरीकडे या उलट एक्झिट पोलमध्ये अगदीच कमी जागा मिळतील असं वाटत असलेल्या इंडिया आघाडीनेही 200 हून अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे केंद्रात भाजपाला एकहाती बहुमत न मिळाल्याने मित्र पक्षांच्या मदतीने आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं आहे. मात्र तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत सरकार स्थापन करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कधीही पडू शकत असा सूचक इशारा शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांचा सूचक असा 'वस्ताद' म्हणून उल्लेख करत आपलं मत मांडलं.

वस्ताद एक डाव..

अमोल कोल्हेंनी जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण देताना, सध्या केंद्रामध्ये विरोधकांना सत्ता स्थापन करता आली नसली तरी हे तत्पुरत्या स्वरुपातील असल्याचं सूचक विधान केलं आहे. "केंद्रातील (एकहाती) सत्ता आता पुरती गेलीय. थोडे फार खासदार कमी पडले नाहीतर केंद्रात सत्ता बदल झाला असता. सहमत आहात?" असं उपस्थितांना विचारलं. त्यावर उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी, "आपण फक्त एक विसरतोय वस्ताद एक डाव हातचा राखून ठेवतोय. त्यामुळे हिरमुसून जाऊ नका. केंद्रात सत्ता आली नाही ती आत्ता आली नाही एवढच म्हणा," असा सल्ला मतदारांना दिला. अमोल कोल्हेंचं हे विधान ऐकून कार्यक्रासाठी आलेल्या समर्थकांनी टाळ्या वाजवत त्यांच्या या विधानाला प्रतिसाद दिला.

हवं तेव्हा सरकार सरकार पलटू शकतं

या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी अमोल कोल्हेंनी संवाद साधला. सध्या केंद्रात असलेला विरोधी पक्ष हा फारच सक्षम असल्याचं अमोल कोल्हेंनी आवर्जून नमूद केलं. "10 वर्ष भाजपाला ज्या सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती इतका सक्षम विरोधी पक्ष समोर आहे," असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच पुढे बोलताना काँग्रेसचा संदर्भ देत हवं तेव्हा सरकार बदलता येईल, असं विधानही अमोल कोल्हेंनी केलं आहे. "मी माध्यमांमधून ऐकलं त्यानुसार काँग्रेसने काल-परवाच इशारा दिला आहे. जेव्हा हवं तेव्हा हे सरकार पलटू शकतं. या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील," असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'

केंद्रात सध्या स्थिती काय?

बहुमतासाठी आवश्यक असलेला 272 चा आकडा गाठण्यासाठी यंदा भाजपाला तेलगू देसम पार्टी आणि जनता दल यूनायटेडची मदत घ्यावी लागली आहे. भाजपाला 240 जगांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे यंदा केंद्रातील सरकार हे आधीच्या दोन टर्मप्रमाणे मोदी सरकार नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.