श्रीमंतांच्या मुलांसाठी स्कूलबस, पण हा शिक्षक वीटभट्ट्यांजवळच शाळा भरवतो

यालाच म्हणता येईल, 'शाळा आली वंचितांच्या दारी'...

Updated: Feb 13, 2020, 08:39 PM IST
श्रीमंतांच्या मुलांसाठी स्कूलबस, पण हा शिक्षक वीटभट्ट्यांजवळच शाळा भरवतो title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : रोजच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेळघाटातील आदिवासी बांधव विटा बनवण्याच्या कामाकरता शहरातील विटभट्टी परिसरात परिवारासह स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षणाअभावी मोठं नुकसान होतं. यावर जिल्हा परिषदेचे शिक्षक या लहानग्यांचं आयुष्य घडवण्यासाठी 'कुंभार' झाले आहेत. 

भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेळघाटमधल्या दुर्गम भागातून मोठ्या संख्येने आदीवासी कुटुंबासह, अमरावतीतल्या अंजनगाव बारी मार्गावर असलेल्या दिडशे ते दोनशे विटभट्ट्यांवर मजुरी करतात. साधारण दिवाळी ते होळी असे सहा - सात महिने ते इथे असतात. त्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. हे चित्र बदलण्याचं काम अमरावतीतले जिल्हा परिषदेचे शिक्षक करत आहेत. 

यासाठी कोंडेश्वर अंजगाव बारी रोडवरील दिलीप अडवाणी यांच्या शेतामध्ये यावर्षी २३ जानेवारीपासून वीटभट्टी शाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातल्या ५६ शाळाबाह्य मुलांना, जिल्हा परिषदेचे शिक्षक अभ्यासाचे धडे देत आहेत. अंगणवाडीतली १३ मुलं आणि पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण ४३ मुलामुलींचा यात समावेश आहे. 

इथे मुलांना शिक्षणाकरता एक वही, पेन आणि पाटी जिल्हा परिषेदकडून देण्यात आली आहे. स्वतः शिक्षक विटभट्ट्यांवर जाऊन, या शाळेत घेऊन येतात. शिवाय अंजनगाव बारी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. या मुलांना शिकवण्याकरता सर्व काही करायला तयार असल्याचा निर्धार या शिक्षकांनी बोलून दाखवला. 

विटभट्टी शाळेतल्या मुलांवर विशेष लक्ष दिलं जातं. मुलांचं मन रमावं यासाठी, बोलक्या बाहुल्यांचा खेळ आणि इतरही गमतीजमतीसोबत मुलांना अभ्यास शिकवला जातो.