आधी विदर्भ की आधी लग्न? फडणवीसांच्या 'त्या' घोषणेवरुन जुंपली

गोपीचंद पडळकरांनी लगावला बाळासाहेब थोरातांना टोला

Updated: Jun 28, 2021, 10:17 PM IST
आधी विदर्भ की आधी लग्न? फडणवीसांच्या 'त्या' घोषणेवरुन जुंपली title=

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलातच तापला असून मोर्चे, आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. यातच ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आणि सत्ताधारी पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 'आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जोरदार टोला लगावला आहे. 

फडणवीसांच्या 'त्या' घोषणेचं काय झालं?

'सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” अशी टीका थोरात यांनी केली.

पडळकरांचं थोरातांना उत्तर

बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वक्तव्यावरून थोरातांना टोला लगावला आहे. 'महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भ यात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचंही भान यांना राहिलं नाही,' असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना टोला लगावला आहे.