प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : (Alibaug News) दोन दिवसांची सुट्टी असो किंवा आठवडी सुट्टीला जोडून आलेली सुट्टी, मुंबईकरांचे पाय अनेकदा एकाच ठिकाणाच्या दिशेनं वळतात आणि ते ठिकाण म्हणजे अलिबाग. मागील काही वर्षांमध्ये अलिबागमध्ये पर्यटनाचा चांगलाच विकास झाला असून, विविध ठिकाणच्या पर्यटकांकडूनही येथील अनेक गावांना पसंती मिळताना दिसते. पण, याच अलिबागमध्ये आता एक असा प्रकार घडला आहे, ज्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
अलिबाग पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार अलिबाग पासून जवळच असणाऱ्या परहुर पाडा या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली एक कॉल सेंटर सुरू होतं.
परहुर पाडा इथं सुरु असणाऱ्या या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात होती. या ठिकाणी रात्रीच्या वेळी 20 ते 25 तरुण कॉल सेंटर चालवत होते. या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत असत.
हे तरुण कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांशी संपर्क साधत आणि आणि त्यांना सेक्स संबंधित गोळ्या, औषधे पुरवतो असं सांगून त्यांच्याकडून पैशांची ऑनलाईन लूट करत होते. परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या या टोळीचा सुगावा लागताच अलिबाग पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रातोरात या कॉल सेंटरचा खेळ उध्वस्त केला. सध्या या प्रकरणी पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.